
परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)। बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. पांडुरंगजी नावंदर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील अंबिका नगर येथील बाल विद्याविहार प्रशाला येथे रविवार 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता शालेय पातळीवरील भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही चित्रकला स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार असून ‘अ’ गटात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येणार आहे. या गटासाठी प्रथम पारितोषिक रु. 2001/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रु. 1501/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच तृतीय पारितोषिक रु. 1001/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ठेवण्यात आले आहे. तर ‘ब’ गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून या गटासाठी प्रथम पारितोषिक रु. 3001/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रु. 2501/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक रु. 2001/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आकर्षक पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्व. डॉ. पांडुरंगजी नावंदर यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन बाल विद्याविहार प्रशालेचे मुख्याध्यापक व बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis