
परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)।
विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अंतर्मनाची शक्ती जागृत करून आपले व्यक्तिमत्व वैश्विक बनवावे, असे आवाहन केंब्रिज विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर तथा संशोधिका डॉ. नाझिया हबीब यांनी केले.
येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये डॉ. नाझिया हबीब यांच्या विशेष भेटीनिमित्त ‘पॉवर ऑफ एज्यूकेशन... थिंक ग्लोबल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नाझिया हबीब (संस्थापक, सेंटर फॉर रेझिलिअन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, असोसिएट प्रोफेसर, केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड ), कॅमेरोन हाफ (अर्थशास्त्रज्ञ, इंग्लंड), दारासिंग खुराना (कॉमनवेल्थ युथ ब्रँड अँबेसेडर), राकेश खुराणा हे उपस्थित होते. तर महेंद्र मोताफळे (संचालक ओयासिस इंग्लिश स्कूल, परभणी), प्रा. भीमराव खाडे, केशव अण्णा दुधाटे (ज्येष्ठ शिक्षक नेते), प्रा. शितल सोनटक्के (सचिव ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी), अण्णा जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्ञानसाधना प्रतिष्ठान मधील स्काऊट गाईड पथकाने संचलनाद्वारे मान्यवरांचे मानवंदना देऊन स्वागत केले. पाहुण्यांच्या आगमनाप्रसंगी सामूहिक राज्यगीत सादर करण्यात आले. तसेच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हे सामूहिक नृत्य सादर करून महाराष्ट्राची संस्कृती सादर केली. तर ‘जगाचा पोशिंदा: बळीराजा’ हे शेतकरी जीवनावर आधारित नृत्य सादर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis