
नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सिडको विभागात भाजपाच्या उमेदवारीवर मोठा गोंधळ उडाला आहे. प्रभाग क्रमांक २५, २६ (क) आणि २९ मध्ये एकाच प्रभागासाठी डबल एबी फॉर्म देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमांनुसार हस्तक्षेप करत काही उमेदवारांचे एबी फॉर्म अवैध ठरवले असून, त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
प्रभाग २५ : चार एबी फॉर्म, दोन जागा
प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपाकडून भाग्यश्री ढोमसे, संगीता पाटील, हर्षा बडगुजर व साधना मटाले यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र दोन जागांसाठी चार एबी फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार हर्षा बडगुजर व साधना मटाले यांचे एबी फॉर्म वैध, तर भाग्यश्री ढोमसे व संगीता पाटील यांचे एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आले.
या निर्णयानंतर भाग्यश्री ढोमसे व संगीता पाटील अपक्ष निवडणूक लढवणार की अर्ज मागे घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शाब्दिक चकमक; अन्यायाचा आरोप
या प्रकरणामुळे नाराज झालेल्या भाग्यश्री ढोमसे व रवी पाटील यांची भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. संगीता पाटील यांचे पती रवी पाटील यांनी हा प्रकार खानदेशी मतदारांवर अन्याय असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयाराम-गयारामांना उमेदवारी दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रभाग २६ (क) : अलका अहिरे वैध, पुष्पावती पवार अवैध
प्रभाग क्रमांक २६ (क) मध्ये भाजपाच्या माजी नगरसेविका अलका अहिरे आणि पुष्पावती पवार या दोघींनाही एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ झाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय देत अलका अहिरे यांचा अर्ज वैध, तर पुष्पावती पवार यांचा अर्ज अवैध ठरवला.
चौकट : नियम काय आहेत ?
निवडणूक नियमांनुसार, एका प्रभागात डबल एबी फॉर्म दिले गेल्यास ज्याचा नामनिर्देशन अर्ज आधी दाखल झाला असेल त्याचाच एबी फॉर्म ग्राह्य धरला जातो, तर नंतर दाखल झालेला एबी फॉर्म अवैध ठरतो. याच निकषांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिले.
कडेकोट बंदोबस्त
या घडामोडींमुळे सिडको विभागीय कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रभाग २९ : निर्णय दीपक बडगुजर यांच्या बाजूने
प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे व सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना डबल एबी फॉर्म दिल्याचा प्रकार समोर आला होता. नियमांनुसार अखेर निर्णय दीपक बडगुजर यांच्या बाजूने देण्यात आला. यावेळी समर्थकांमध्ये काही तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
डबल एबी फॉर्म, उमेदवारी रद्द, नाराजी आणि थेट आरोपांमुळे सिडको विभागात भाजपाचे निवडणूक व्यवस्थापन कोलमडल्याची चर्चा रंगली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेला हा अंतर्गत वाद भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV