
नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)।
: महाराष्ट्राच्या ५९ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा भव्य शुभारंभ करण्यात आला .यावर्षी ऐतिहासिक निरंकारी संत समागम सांगली नगरीत नाशिक मुंबईसह खान्देशातुन हजारो सेवादल व भक्तगण सेवेसाठी उपस्थित झाले आहेत . सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्रिध्यात महाराष्ट्राचा निरंकारी संत समागम भव्यदिव्य स्वरुपात दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी सांगली ईश्वरपुर रोड, प्रकाश ॲग्रो समोर, सांगलवाडी, सांगली येथील विशाल मैदानांवर आयोजित करण्यात येत आहे. सत्याचा बोध प्राप्त करुन आत्ममंथन करत जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्य जन्माच्या मुख्य उद्देशाकडे अग्रेसर होऊन विश्वामध्ये प्रेम, बंधुत्व, शांती व सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे या समागमाचा मुख्य उद्देश आहे. सुमारे ३५० एकराच्या विशाल प्रांगणात आयोजित होत असलेल्या या भव्य आध्यात्मिक आयोजनाच्या तयारीसाठी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे मुख्य संचालक एस.के.जुनेजा यांच्या हस्ते फावड्याने मैदानावरील माती काढून करण्यात आला. या प्रेरणादायी समारोहाचा प्रारंभ सतगुरुंचा जयघोष व निराकार ईश्वराच्या प्रार्थनेने करण्यात आला. त्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित सेवादल स्वयंसेवकांद्वारे सतगुरु प्रार्थनेचे गायन करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारों निरंकारी भक्तगणांनीही या समारोहामध्ये भाग घेतला. स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना जुनेजाजी म्हणाले, की हा संत समागम सांगली नगरीसाठी एक ऐतिहासिक क्षण बनून राहील. सेवादल स्वयंसेवकांनी समागम समितीच्या निर्देशानुसार खांद्याला खांदा लावून निरंतर सेवा करत या मैदानाला सुंदर रूप द्यावे आणि लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम व्यवस्था तयार करावी. प्रचार प्रसार विभागाचे छाब्राजी यांनी समस्त मानवतेला संत समागमाच्या शुभकामना व्यक्त करताना सांगितले, की सतगुरु मानवमात्राचे कल्याण करण्यासाठी जगामध्ये प्रकट होत असतो. हा संत समागम समस्त मानवतेसाठी कल्याणकारी व्हावा आणि त्यामधील संदेशाने मानवाने वेळीच जागृत व्हावे व आपल्या जीवनाचे सार्थक करावे, असे ते शेवटी म्हणाले. हा दिव्य संत समागम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण हजारोंच्या संख्येने समागम स्थळी येऊन तन्मयतेने समागमाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सेवा अर्पण करणार आहेत .
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV