रत्नागिरीत ५-६ जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला
रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. व्याख्यानमालेदरम्यान ६
बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला


रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेदरम्यान ६ जानेवारीला पत्रकार दिनी संघाचा दर्पण पुरस्कार सकाळचे राजापूरचे प्रतिनिधी राजेंद्र तुकाराम बाईत यांना प्रदान करण्यात येणार आहे. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार असून लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ. नयना लिमये-सहस्रबुद्धे आणि सुशील कुलकर्णी यांची व्याख्याने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना लाभणार आहे, अशी माहिती कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे व केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दिली.

नयना सहस्रबुद्धे यांचे बदलती जीवनशैली व हिंदू कुटुंबांसमोरील आव्हाने या विषयावरील व्याख्यान ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता आहे. रत्नागिरीजवळचे कर्ले हे त्यांचे मूळ गाव असून त्या रत्नागिरीच्या माहेरवाशिण आहेत. त्या सामाजिक विषयांवर विचारप्रवर्तक लेखन व भाषणे करतात. भारतीय स्त्रीविमर्श, पाश्चिमात्य व जागतिक स्त्रीवादाच्या त्या अभ्यासक आहेत. १९९० पासून भारतीय स्त्रीशक्ती संघटनेचे काम करत आहेत. ठाणे शाखा, ते महाराष्ट्र व राष्ट्रीय सचिव नंतर अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली. सध्या राष्ट्रीय सह-संगठन सचिव व स्त्रीशक्तीच्या आंतरराष्ट्रीय आयामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मार्च २०२५ मध्ये युनायटेड नेशन्स, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सीएसडब्ल्यू ६९ या परिषदेला उपस्थित राहिल्या व भारत सरकारद्वारा आयोजित चर्चासत्रात वक्ता सदस्य होत्या. २०२६ मध्ये csw ७० या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी १९८४ पासून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३९ वर्षे नोकरी केली व एप्रिल 2023 मध्ये ‘डेप्युटी जनरल मॅनेजर’ या उच्चपदावरून त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या स्त्रीभान या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपयाचा ‘अनंत काणेकर’ पुरस्कार व त्याव्यतिरिक्त दोन पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय अन्य अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार, यूट्युबर सुशील कुलकर्णी माध्यमांचा विळखा आणि तरुणाई या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर विश्लेषण करतात. त्यानंतर दर्पण पुरस्कार राजेंद्र बाईत यांना प्रदान करण्यात येणार आहे. ते शीळ (राजापूर) येथील रहिवासी असून २० वर्षे पत्रकारितेत आहेत. वाणिज्य पदवीधर आणि पत्रकारितेची पदविका त्यांनी घेतली आहे. दै. सकाळमध्ये राजापूर तालुका प्रतिनिधी म्हणून १ जानेवारी २००४ पासून ते कार्यरत आहेत. राजापूर पत्रकार संघ, ज्ञानसागर वाचनालय, कोकण मराठी साहित्य परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते कार्यरत आहेत. यापूर्वी राजेंद्र बाईत यांना राज्य शासन पर्यटन संचालनालयाचा पर्यटन मित्र पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक विषयावर त्यांनी स्वतंत्र लेखन केले आहे. राजापूर तालुक्‍यासह शहराचा पाणीप्रश्‍न, ब्रिटिशकालीन वखारीचा मागोवा, अर्जुना–कोदवली नदीतील गाळाचा प्रश्‍न, ब्रिटिशकालीन इतिहास, सौंदळ रेल्वे स्टेशनचा प्रश्‍न, विविध समस्या यावर त्यांनी लिखाण केले आहे. दै. अॅग्रोवनसाठीही त्यांनी शेतकऱ्यांच्या यशोगाथा लिहिल्या आहेत. सकाळमधील बिग स्टोरीसाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प, पर्यटन व्यवसायातील संधी, हवामानातील बदल आणि शेती, आंबा-काजू व्यवसायातील समस्या, पूररेषा, महामार्गावरील वृक्षलागवड, चक्रव्यूहामध्ये अडकलेला नारळ, रिफायनरी प्रकल्प, कासव महोत्सव, रेशीम शेती अशा अनेक वृत्तकथा लिहिल्या आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई, के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, कार्यवाह सौ. ऋचा जोशी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande