
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)।
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेण्यात आला होता. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा-मुंडे यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून या प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत फेटाळून लावले.
धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा मुंडे यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली.
करुणा मुंडे यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा मुंडे यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी एक निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदीवरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis