
गुवाहटी, 31 डिसेंबर (हिं.स.) । आसाममध्ये पाकिस्तानप्रायोजित दहशतवादी कट प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहम्मद कमरुज जमान उर्फ कमरुद्दीन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुवाहाटी येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने त्याला गैरकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दोषी ठरवले.
मोहम्मद कमरुज जमानचा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 2017–18 या कालावधीत देशात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या कटात तो सक्रिय सहभागी होता. तसेच त्याने या कारवायांसाठी इतर अनेकांची भरती केल्याचेही उघड झाले आहे. एनआयएनुसार, जमान हा आसामचा रहिवासी असून तो पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूलचा भाग होता. पाकिस्तानच्या दहशतवादी उद्दिष्टांना चालना देण्यासाठी तो कट रचत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.गुवाहाटीतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने जमानला गैरकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत तीन वेगवेगळ्या शिक्षांचा आदेश दिला असून त्यामध्ये जन्मठेपेचाही समावेश आहे. याशिवाय त्याच्यावर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तपासादरम्यान असेही समोर आले की, जमान हा पाकिस्तानस्थित हिजबुल मुजाहिदीनच्या संपर्कात होता आणि 2017–18 दरम्यान भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होता. एनआयएने दाखल केलेल्या खटल्यात त्याचा दहशतवादी कटातील सहभाग सिद्ध झाला. तसेच लोकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचाही आरोप त्याच्यावर सिद्ध झाला आहे. एनआयएच्या माहितीनुसार, जमानने सहनवाज आलम, सईदुल आलम आणि उमर फारूक यांच्यासह अनेकांची भरती केली होती. हे सर्वजण मिळून दहशतवादी घटना घडवून आणण्याच्या तयारीत होते. मार्च 2019 मध्ये एनआयएने एकूण 5 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात एनआयए न्यायालयाने सहनवाज, सईदुल आणि उमर यांना यापूर्वीच दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. मात्र पाचवा आरोपी जयनाल उद्दीन याचा खटल्यादरम्यान आजारपणामुळे मृत्यू झाला होता.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी