खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर ढाक्यात दाखल
नवी दिल्ली , 31 डिसेंबर (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये आज (31 डिसेंबर) माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांना दफन करण्यात येणार आहे. या प्रसंगी अनेक देशांचे प्रतिनिधी बांग्लादेशात दाखल झाले आहेत. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे खालिदा झ
खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर  ढाक्यात दाखल


नवी दिल्ली , 31 डिसेंबर (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये आज (31 डिसेंबर) माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांना दफन करण्यात येणार आहे. या प्रसंगी अनेक देशांचे प्रतिनिधी बांग्लादेशात दाखल झाले आहेत. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी ढाक्यात गेले आहेत.या दरम्यान डॉ. जयशंकर यांनी खालिदा झिया यांचे पुत्र तारीक रहमान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शोकपत्र सुपूर्द केले.

एस. जयशंकर बुधवारी बेगम खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी ढाक्यात दाखल झाले. ढाका विमानतळावर बांग्लादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. जयशंकर यांना घेऊन आलेले विशेष विमान सकाळी ११:३० वाजता ढाक्यात उतरले. एका अधिकृत निवेदनानुसार, डॉ. जयशंकर हे भारत सरकार आणि भारतातील जनतेचे प्रतिनिधित्व करत खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होत आहेत.भारतातील बांग्लादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्लाह यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, ढाक्यात डॉ. एस. जयशंकर यांनी बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या, तसेच लोकशाहीसाठी त्यांच्या योगदानाची दखल घेतली.

शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यानंतर डॉ. एस. जयशंकर यांचा हा पहिलाच बांग्लादेश दौरा असून, भारत-बांग्लादेशमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ढाक्यात पोहोचताच जयशंकर यांनी खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे सर्वोच्च नेते तारीक रहमान यांची भेट घेतली.तारीक रहमान यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांची कन्या जायमा रहमान हेदेखील उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान जयशंकर आणि तारीक रहमान यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, ज्याची छायाचित्रेही समोर आली आहेत. ही भेट आणि हस्तांदोलन अशा वेळी झाले आहे, जेव्हा भारत आणि बांग्लादेशमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, तारीक रहमान 17 वर्षांनंतर आपल्या देशात परतले आहेत, आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची पार्टी बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी सहभागी होणार आहे. ते बांग्लादेशच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.या पार्श्वभूमीवर, भारताची ही पुढाकाराची भूमिका बांग्लादेशसोबतचे संबंध भविष्यात अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande