
रायपूर, 31 डिसेंबर (हिं.स.) । विकास आणि पर्यावरण यांच्या समतोल राखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज, बुधवारी केले. छत्तीसगडच्या रायपूर येथे एम्सतर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. भागवत म्हणाले की, आजपर्यंत जग असे कोणतेही विकास मॉडेल तयार करू शकलेले नाही, ज्यामध्ये पर्यावरणाला हानी न पोहोचवता पायाभूत सुविधा आणि विकास एकाच वेळी पुढे जाऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्ग आणि विकास यांच्यात समतोल साधणे अत्यावश्यक आहे.अरावली पर्वतरांगेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जर अनियंत्रित विकास अशीच गती घेत राहिला, तर भविष्यातील पिढ्यांना पर्यावरणीय असमतोलाची मोठी किंमत मोजावी लागेल. निसर्ग आणि विकास यांना परस्परविरोधी न मानता, समांतरपणे पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पर्यावरण संरक्षण केवळ सरकारी धोरणांवर अवलंबून नसून, सामान्य नागरिकांच्या जीवनशैलीतील बदलही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच निसर्गसंवर्धनाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी तरुणांना आवाहन केले की, करिअर आणि रोजगाराच्या उद्दिष्टांसोबतच पर्यावरणाविषयीची सामाजिक जबाबदारीही ओळखावी. लहान-लहान सवयी आणि निर्णयांतून मोठे सकारात्मक बदल घडू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सरसंघचालकांनी तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेवरही भाष्य केले. कुटुंबातील संवादाचा अभाव, नातेसंबंधांची कमकुवत होत चाललेली वीण आणि एकटेपणाची भावना यामुळे तरुण मोबाइल आणि व्यसनांकडे वळत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. कुटुंब आणि समाजाने मिळून संवादपूर्ण व सकारात्मक वातावरण निर्माण केल्यास ही समस्या कमी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी रायपूर येथील राम मंदिर परिसरात सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सामाजिक सद्भावना बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विविध समाजांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि बुद्धिजीवी सहभागी होणार असून सामाजिक समरसता आणि समकालीन विषयांवर चर्चा होणार आहे.हा दौरा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांचा भाग असून, तरुण आणि समाजाच्या विविध घटकांशी थेट संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती संघाच्या प्रचार विभागाककडून देण्यात आली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी