एकाच लॉन्चरमधून ‘प्रलय’ क्षेपणास्त्रांचे यशस्वी सॅल्व्हो प्रक्षेपण
डीआरडीओकडून ओडिशा किनाऱ्याजवळ यशस्वी चाचणी नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या संरक्षण क्षमतेला मोठी बळकटी देणाऱ्या कामगिरीत संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) बुधवारी ओडिशा किनाऱ्याजवळ एकाच लॉन्चरमधून ‘प्रलय’ क्षेपणास्त्रांचे यशस्व
‘प्रलय’ क्षेपणास्त्रांचे यशस्वी सॅल्व्हो प्रक्षेपण


डीआरडीओकडून ओडिशा किनाऱ्याजवळ यशस्वी चाचणी

नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.)। भारताच्या संरक्षण क्षमतेला मोठी बळकटी देणाऱ्या कामगिरीत संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) बुधवारी ओडिशा किनाऱ्याजवळ एकाच लॉन्चरमधून ‘प्रलय’ क्षेपणास्त्रांचे यशस्वी सॅल्व्हो प्रक्षेपण केले. ही चाचणी यूजर इव्हॅल्युएशन ट्रायल्स अंतर्गत पार पडली असून दोन्ही क्षेपणास्त्रांनी सर्व निर्धारित उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण केली.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे 10.30 वाजता ही चाचणी घेण्यात आली. अत्यल्प वेळेच्या अंतरात एकाच लॉन्चरमधून दोन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आले, जे स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. दोन्ही क्षेपणास्त्रांनी नियोजित मार्गाचे अचूक पालन करत लक्ष्य गाठले. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवर तैनात अत्याधुनिक ट्रॅकिंग सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्रांच्या संपूर्ण उड्डाण मार्गावर लक्ष ठेवण्यात आले. तसेच लक्ष्य क्षेत्राजवळ तैनात जहाजांवरील टेलिमेट्री प्रणालीद्वारे अंतिम टप्प्यातील कामगिरीची यशस्वी नोंद करण्यात आली.

‘प्रलय’ हे स्वदेशी, घन इंधनावर चालणारे क्वासी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून त्यात अत्याधुनिक मार्गदर्शन व नेव्हिगेशन प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. विविध प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आणि अचूक लक्ष्यभेदन ही या क्षेपणास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.या क्षेपणास्त्राचा विकास हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे. प्रकल्पात डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांसह भारतीय उद्योगांचा सक्रिय सहभाग होता. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी विकास-सह-उत्पादन भागीदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी सॅल्व्हो प्रक्षेपणाबद्दल डीआरडीओ, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि संरक्षण सार्वजनिक उपक्रमांचे अभिनंदन केले. ही कामगिरी क्षेपणास्त्र प्रणालीच्या विश्वासार्हतेचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. डीआरडीओ प्रमुखांनीही ही चाचणी ‘प्रलय’ क्षेपणास्त्राच्या लवकरच सैन्यात समावेश होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande