
कोल्हापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
महायुतीतील घटक पक्ष असलेले जनसुराज्य शक्ती आणि रिपाई आठवले गट या दोन पक्षानी एकत्र येऊन कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी सवता सुभा मांडला. महायुतीने जागा वाटपात स्थान दिले नसल्याने दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक 30 जागेवर लढवणार असून असल्याची घोषणा जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते समित कदम आणि रिपाईचे उत्तम कांबळे, प्रा शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली..
जनसुराज्य शक्ती आणि रिपाई आठवले गटाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी समीत कदम यांनी दोन पक्षाच्या युतीची घोषणा करुन कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीत 30 जागा लढवणार असल्याचे संगीतले. महायुतीतील घटक पक्ष असूनही जिल्हयातील नेत्यांनी आमच्या दोन्ही पक्षांना जागा वाटपात स्थान दिले नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्रित 30 जागा लढवणार असून यासाठी निश्चित केलेले सर्व उमेदवार सक्षम आहेत. सर्व्हेक्षणातही ते आघाडीवर आहेत त्यामुळे ते निश्चीत निवडून येतील असे समीत कदम यांनी सांगीतले. प्रा. शहाजी कांबळे म्हणाले की रिपाई हा दलित, वंचित समाजासाठी रस्त्यावर. उतरून आंदोलन करणारा पक्ष आहे. शहरातील राजेंद्रनगर, कनाननगर, विचारे माळ संभाजीनगर आदी भागात आमचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या प्रमाणात आहेत अशा ठिकाणी आमच्या पक्षाला प्रतिनिधीत्व देणे आवश्यक होते. पण त्याचा महायुतीने विचार केला नाही. रिपाईचे नेते, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, जनसुराज्यचे नेते आ. विनय कोरे यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. या निवडणूकीत आमच्या युतीला चांगले यश मिळेल. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी त्यावेळच्या परिस्थिती नुसार निर्णय घेणार असल्याचे समीत कदम यांनी सांगीतले.
यावेळी आ. अशोकराव माने, रमेश पुरेकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar