जळगाव - मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट कारवाई
जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) एकीकडे महापालिका निवडणुकांचा फिव्हर, तर दुसरीकडे नववर्ष स्वागताची लगबग, अशा दुहेरी पार्श्वभूमीवर जळगाव शहर व परिसरात पोलिस यंत्रणा पूर्णतः अलर्ट मोडवर आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट तसेच शहरात
जळगाव - मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट कारवाई


जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) एकीकडे महापालिका निवडणुकांचा फिव्हर, तर दुसरीकडे नववर्ष स्वागताची लगबग, अशा दुहेरी पार्श्वभूमीवर जळगाव शहर व परिसरात पोलिस यंत्रणा पूर्णतः अलर्ट मोडवर आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून मित्रमंडळी व कुटुंबियांसह पार्टींचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. शहरालगतच्या हॉटेल्स व रिसॉर्ट्सवर विविध कार्यक्रम, संगीत व पार्टींचे आयोजन होत असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाद-विवाद किंवा किरकोळ मारामारीचे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

महापालिका निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने राजकीय कार्यक्रम, कार्यकर्त्यांची वर्दळ आणि मतदारांसाठी आयोजित पार्टी यामुळे वातावरण अधिकच संवेदनशील झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी नियोजन आखत शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे २० कर्मचारी विशेष तैनात राहणार असून त्यांच्या मदतीला तीन ब्रेथ अ‍ॅनालायझर उपलब्ध असतील. याशिवाय शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांकडूनही ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. संशयित वाहनधारकांची तात्काळ चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साह असतोच; मात्र यंदा महापालिका निवडणुकांमुळे उमेदवारांकडून कार्यकर्ते व मतदारांसाठी विविध पार्टींचे आयोजन होत असल्याने थर्टी फर्स्ट अधिकच ‘जंगी’ होण्याची शक्यता आहे. मात्र या उत्साहाला कायद्याची चौकट राहावी, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही नियमांचे पालन करून सुरक्षित आणि आनंदी नववर्ष साजरे करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande