
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)।
शेतकऱ्यांना पिककर्ज मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बँकेत वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने जनसमर्थ पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवरून शेतकरी आता घरबसल्या पिककर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे कर्ज प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार आहे.
राष्ट्रीयकृत बँकांकडून आता ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू झाली आहे. पिक कर्ज घेण्यासाठी अर्जदार शेतक-यांकडे वैध फार्मर आयड़ी, आधार कार्ड वबँक खात्याची माहिती हवी. पीक कर्ज मंजुर झाल्यास शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल, ज्याव्दारे ते वेळेवर रकमेचा वापर करू शकतील. शेतक-यांना दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होईल. याचा उपयोगी बी-बियाणे, खते, पिकसाधने व कृषी साधनांसाठी केला जाऊ शकतो.
सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. जनसमर्थ पोर्टलवर लॉगिन करून अर्ज करता येतो. पोर्टलवर मोफत मार्गदर्शनही दिले जाते. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीची मालकी किंवा भाडेकराराचे दस्तऐवज असणे आवश्यक आहे. अर्ज करताना क्य, उत्पन्न आणि पूर्वी घेतलेल्या कर्जाचा तपशील तपासला जाणार आहे. अर्ज करताना पोर्टलवर लॉगिन करावे लागते. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून रक्कम निवडावी लागते. या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis