
सोलापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती होत असून, त्यात सोलापूर शहर पोलिस दलातील ७९ आणि ग्रामीण पोलिसांकडील ९५ पदे आहेत. पोलिस भरतीसाठी राज्यभरातून एका पदासाठी तब्बल १०६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये हे प्रमाण एका पदासाठी ५० उमेदवार असे आहे.
सोलापूर शहरात एका पोलिस शिपाई पदासाठी ४३ तर बँड्समनच्या एका पदासाठी १६९ उमेदवार आहेत.सोलापूरसह राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर सुरू होईल. महापालिकेनंतर ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारीत मैदानी चाचणी सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी मैदानी संपविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. उमेदवारांच्या अर्जांची संख्या राज्यात १६ लाख ७० हजारांपर्यंत असल्याने मैदानी चाचणीसाठी अंदाजे चार महिने लागतील.मैदानी पार पडल्यावर पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. दरम्यान, सोलापूर शहरातील पोलिस शिपायांच्या ७३ पदांसाठी पुरुष उमेदवारांचे दोन हजार ४८८, महिला उमेदवारांचे ६२० आणि माजी सैनिक उमेदवारांचे २६ अर्ज आहेत. दुसरीकडे, बँड्समनच्या सहा पदांसाठी पुरुष उमेदवारांचे ७८५, महिला उमेदवारांचे २२७ आणि तृतीयपंथी उमेदवाराचा एक अर्ज असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड