
डोंबिवली, 31 डिसेंबर (हिं.स.)। कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणुकीत मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट पहायला मिळणार आहे. जरी एकूण 122 जागांसाठी निवडणूक होणार असली तरी बिनविरोध म्हणून भाजपचे दोन उमेदवार मतमोजणी अगोदरच विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक निकालात भाजपा अशीच घोडदौड करणार का अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे आणि कल्याणमधील रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आल्या. आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना (शिंदे गट)- 66 जागांवर लढणार आहे तर भाजप- 56 जागांवर लढणार आहे. आता निवडणूक अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीतील नेते बंडखोर उमेदवारांना कसे आवर घालणार हे मोठे आव्हान आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi