
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)।
वर्ष २०२५ या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि २०२६ या नववर्षाचे स्वागत करताना बीड जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीसह 'गुलाबी थंडी' जाणवणार आहे. जिल्ह्यात पुढील ६ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. यामुळे थंडीचा जोर कायम असला तरी तापमानात कमालीचा चढउतार पहायला मिळणार आहे.
यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, सर्वत्र प्रकल्प फुल्ल झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात बीडमध्ये दिवसाचे कमाल तापमान साधारणपणे ३३ ते ३५ च्या आसपास राहिले.
पावसाळा संपल्यानंतर 'ऑक्टोबर हीट' मुळे दिवसा उष्णता जाणवत होती. रात्रीचे किमान तापमान सुमारे १८ ते २२ पर्यंत खाली येत होते. नोव्हेंबरमध्ये तापमानात घट होऊन हिवाळ्याची सुरुवात झाली. या महिन्यात कमाल तापमान ३० ते ३२ आणि किमान तापमान १४ ते १७ च्या दरम्यान राहिले. डिसेंबरमध्ये कडाक्याची
थंडी सुरू झाली. बीडमध्ये किमान तापमान १० ते १४ अंशापर्यंत खाली आले आहे.
या महिन्याच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला पुढील ६ दिवसांत जिल्ह्याचे कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. किमान तापमान १२ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिमी विक्षोभांच्च्या कमकुवत हालचालींमुळे प्रभाव
या दरम्यान, ढगाळ वातावरण नसल्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे सकाळी तसेच सायंकाळच्या वेळी दृश्यमानता कमी राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis