
बीड, 31 डिसेंबर, (हिं.स.) - राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे विशेष कार्यक्रम झाला. यावेळी बिंदू माधव जोशी यांच्या ग्राहक चळवळीवरील कार्याची आठवण करून देण्यात आली. महाबळेश्वर येथे झालेल्या 'संघटकाची अष्टाध्यायी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमात ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा झाली. विषय होते ग्राहकांचे अधिकार, कर्तव्ये आणि सजग ग्राहक, तनुजा वैजनाथ खाडे (दहावी) हिने प्रथम क्रमांक मिळवला. तन्मय अशोक घाडगे (दहावी) दुसऱ्या क्रमांकावर राहिला. प्रिया जयराम सुरवसे (नववी) हिला तिसरा क्रमांक
मिळाला.
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष विष्णू ऊर्फ विशाल देशमुख यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. ग्राहकांचे हक्क जपण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ग्राहक संरक्षण परिषद व न्यायालयांची तरतूद असल्याचे सांगितले. ग्राहक न्यायालयात वकिलाची गरज नसते. नुकसान भरपाई मिळते. न्याय लवकर मिळतो, हे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार डी. बी. निलावाड यांनी ग्राहकांचे अधिकार आणि कर्तव्ये सांगितली. खरेदी करताना पावती घेणे, चुकीच्या जाहिराती ओळखणे, फसवणूक केल्यास गप्प न बसता कायद्याचा मार्ग स्वीकारणे, असा संदेश दिला. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis