
मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) - राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती निश्चित झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सातपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवली होती. त्यातून सदानंत दाते यांच्या नियुक्तीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.
शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) भारतीय पोलीस सेवा रश्मी शुक्ला यांचा 'महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक' म्हणून कार्यकाळ ३ जानेवारीला २०२६ रोजी संपत आहे. त्यानंतर सदानंद दाते पदभार स्वीकारतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलमेंट समितीने शिफारस केलेल्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले सदानंद वसंत दाते, भारतीय पोलिस सेवा यांची 'महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक (एचओपीएफ)' या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निकाल आणि आदेशांनुसार, 'पोलीस महासंचालक (HOPF)' या पदावर नियुक्त झालेल्या भारतीय पोलीस सेवेच्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. त्यानुसार, भारतीय पोलीस सेवेचे सदानंद वसंत दाते हे नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी 'पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (HOPF)' या पदावर राहतील.
सदानंद दाते १ एप्रिल २०२४ पासून राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक (डीजी) होते. यापूर्वी त्यांनी सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था) आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरार प्रदेशांचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
दाते यांनी वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.), इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून पात्र कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि हम्फ्रे फेलोशिप अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठात व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रणाचा अभ्यास केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी