शिक्षकांना बीएलओ कामातून कार्यमुक्त करावे; सेलूतील मुख्याध्यापकांचे तहसीलदारांना निवेदन
परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)। सेलू शहरातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) तसेच मास्टर ट्रेनरच्या कामातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी शाळांच्या मुख्याध्यापकांनी सेलूच्या तहसील
शिक्षकांना बीएलओ कामातून कार्यमुक्त करावे; सेलूतील मुख्याध्यापकांचे तहसीलदारांना निवेदन


परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)।

सेलू शहरातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) तसेच मास्टर ट्रेनरच्या कामातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी शाळांच्या मुख्याध्यापकांनी सेलूच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याध्यापक धनंजय भागवत, मोगल आर. एस., कपाटे पी. टी., थटवले आर. एल., शिंदे डी. डी., गोरे आर. जी., पाठक आर. बी., धारासूरकर एस. एस., साळवे जी. आर., पांडे यू. जी. आदींच्या शिष्टमंडळाने सेलू तहसीलदारांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक बीएलओ तसेच मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. हे कार्य राष्ट्रीय स्वरूपाचे असल्याने यास कधीही विरोध करण्यात आलेला नाही. मात्र सध्याच्या काळात शिक्षकांवर ऑनलाइन स्वरूपातील अनेक कामांचा ताण वाढलेला आहे. वर्ग अध्यापनात सातत्य राहात नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी निर्माण होत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थी संख्येवर होत आहे. परिणामी शिक्षक संचमान्यतेतही घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षकांना ऑनलाइन कामे, निपुण चाचण्या, आधार अपडेटेशन, अपार आयडी, विविध माहिती भरणे यांसारखी कामे करावी लागत आहेत. त्यातच अनेक शाळांमध्ये कर्मचारी संख्या अपुरी असून काही कर्मचारी रजेवर असल्यामुळे उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय उपस्थित शिक्षकांना विद्यार्थी सुरक्षा, स्विफ्ट चार्ट उपस्थिती, यू-डायस, आय-गॉट कर्मयोगी, स्टुडन्ट पोर्टल यांसारखी विविध कामे सांभाळून अध्यापन करावे लागत आहे. वरिष्ठ कार्यालयांकडून तात्काळ माहिती मागवली जात असल्याने शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे वेळेत माहिती देणेही कठीण होत आहे, असे नमूद करीत बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना वेळेचे बंधन नसते आणि सातत्याने निवडणुका सुरू असल्यामुळे शिक्षक वर्षानुवर्षे याच कामासाठी नियुक्त राहतात. त्यामुळे अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करावे, अशी मागणी सेलू शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी तहसीलदारांकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande