
अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)
मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामागे विशेष असे कारण असून फलाटांवरील गर्दी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर जाता येणार नाही का ? असा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा उद्देश आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध ०५ते ०६ डिसेंबरपर्यंत आहे. भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला आणि बडनेरा या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती प्रतिबंधित असेल. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी