
अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)
अचलपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १० 'अ' व १९ 'ब' येथे न्यायालयीन प्रकरणामुळे या दोन प्रभागांतील मतदान स्थगित ठेवावे लागले होते. या दोन्ही जागांसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. परंतु नवीन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. ११ डिसेंबरला चिन्ह वाटप तर २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
अचलपूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १० 'अ' हा अनुसूचित जाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागात एकूण ९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. विशाल भारत थोरात यांनी कल्पना पंजाब गवई व शंतनु तेलमोरे यांच्या नामनिर्देशनांवर आक्षेप घेतला होता. मात्र न्यायालयाने हे आक्षेप फेटाळत २३ नोव्हेंबर रोजी आदेश दिला, प्रभाग क्रमांक १९ 'ब' हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या वतीने अर्थव संजय देंडव यांना 'ब' गटासाठी एबी फॉर्म देण्यात आला होता; शिवसेनेच्या उमेदवार अनिता कुन्हेकर यांनीही 'ब' गटातच अर्ज दाखल केला. मात्र एबी फॉर्म 'अ' तर गटाचा लावण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यांची मागणीही न्यायालयाने फेटाळली. या दोन्ही प्रभागांतील न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मूळ कार्यक्रमानुसार अचलपूर पालिकेतील नगराध्यक्ष व ३९ नगरसेवकांची निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पूर्ण झाली; मात्र प्रभाग क्रमांक १० 'अ' व १९ 'ब' वगळण्यात आले होते. या दोन प्रभागांसाठी नव्यानेकार्यक्रम जाहीर करण्यात आला असून नवीन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. मात्र ५ ते १० डिसेंबर दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ११ डिसेंबर रोजी चिन्हांसह अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.प्रभाग क्रमांक १९ 'ब' (शहीद भगतसिंह) मध्ये भाजपचे राजू तायडे, शिवसेना अर्थव दंडव, राष्ट्रवादी फिरोज खां सुलतान खां, काँग्रेस मोबीन उर्फ मो. उस्मान, इतर अतहर अहमद खान (शेर खान), अनिल माहुरे, मो. सलमान मो. सलीम, वसीम खान रशीद खान तर, प्रभाग क्रमांक १० 'अ' (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) मधून भाजपचे ऋषिकांत घन, काँग्रेस विशाल भारत थोरात, शिवसेना भारत प्रभुदास वानखडे, कल्पना पंजाब गवई, शंतनु तेलमोरे, चंद्रेश कांतीलाल बहोरीया, आकाश पारवे, बाबाराव वानखडे, अतुल सरोदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ११ डिसेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही प्रभागांतील प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी