अमरावती, 18 फेब्रुवारी (हिं.स.) अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट - २ ने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २१ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत, तसेच आरोपींकडून ८ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहेत.पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत या बाबींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ३ जानेवारी २०२५ रोजी गाडगेनगर पोलिस स्टेशन येथे एका नागरिकाने तक्रार दिली होती की, त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी चैन स्नॅचिंग केली. तपास सुरू केल्यानंतर, गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातम्यांवर आधारित तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान, आरोपी हसन अली उर्फ आशु नियाझ अली (वय २१), रा. भुसावळ आणि शेख जुबेर शेख निसार (रा. अमरावती) यांचा सहभाग उघड झाला. हसन अलीने आपल्या साथीदारांसोबत अमरावती आणि इतर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटना केल्या असल्याची कबुली दिली. शेख जुबेरने आरोपींना शहरातील स्थानांची माहिती दिली आणि त्यांना आश्रय देखील दिला. पोलीस आयुक्त रेड्डी यांनी सांगितले की, या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली. तपासाच्या वेळी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करण्यात आला, ज्यामुळे आरोपींची ओळख पटली आणि कारवाई शक्य झाली. अद्याप इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त यांनी या कृत्यांची निंदा केली आणि पोलिस दलाने घेतलेल्या कार्यवाहीवर विश्वास व्यक्त केला.पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त सागर पाटील आदी उपस्थित होते.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी