
परभणी, 16 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यात मागील काही महिन्यांपूर्वी जबरी चोरी, दरोडा आणि खून स्वरूपाच्या गंभीर घटना सेलू तालुक्यातील वालूर येथे तसेच चारठाणा आणि परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी शुक्रवारी(दि. १६) परभणी तालुक्यातील झरी येथून शिताफिने ताब्यात घेतले.
सेलू पोलिस स्टेशन हद्दीतील वालूर येथे एका महिला व पुरुषास जबर मारहाण करून आखाड्यावर झोपलेल्या एका मुलास डोक्यात मारहाण करून ठार मारल्याचे घटना घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभिर्यओळखून पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करून रवाना केली होती. या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील झरी येथे घटनास्थळी भेट देऊन फिर्यादींकडून सखोल माहिती प्राप्त केली. तसेच तांत्रिक तपास, आरोपीची अंगकाठी, गुन्हा करण्याची पद्धती याचा सखोल अभ्यास करून गोपनीय माहिती संकलित केली.
मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेने आरोपी बाबुराव उर्फ बाबूशा सावळा पवार रा. पिटोरी शिरसगाव ता. अंबड जि. जालना आणि त्याचे दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गुरुवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी बाबुराव उर्फ बाबूशा सावळा पवार(वय ६०) यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले.
आरोपीचे सखोल चौकशी केली असता त्याने सेलू, परभणी ग्रामीण आणि चारठाणा पोलिस ठाणे येथे दाखल विविध गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस आमदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, केशव लटपटे, रणजीत आगळे, रंगनाथ दुधाटे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर आणि गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis