
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रत्नागिरी शाखेत ३९ बनावट कर्जप्रकरणे तयार करून सुमारे १ कोटी ९८ लाख ६९ हजार ६७३ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी बँकेचे तत्कालीन शाखा प्रमुख संतोष शरद नारकर यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात शेखरकुमार उत्तम अहिरे (वय ५८, रा. राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
संतोष नारकर १ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेत शाखाधिकारी होते, तेव्हा त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला.
बँकेने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा देत त्यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता ३९ बनावट कर्जप्रकरणे तयार केली, ही सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी बँकेतून १ कोटी ९८ लाख ६९ हजार ६७३ रुपयांची रक्कम मंजूर करून घेतली आणि ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेची फसवणूक केली.
हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली आणि अखेर १५ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणी पोलिसात रीतसर तक्रार देण्यात आली.
रत्नागिरी शहर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय गुन्हा दाखल केला आहे. अपहाराचा मोठा आकडा पाहता पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक आणि आर्थिक बाबींतून अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी