कविता कृष्णमुर्ती, शुभा खोटे, अनुपम खेर यांना 'पीफ'चे पुरस्कार जाहीर 
पुणे, 4 फेब्रुवारी (हिं.स.)। ’२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’चा उद्घाटन सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच ,स्वारगेट ,पुणे ,येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५ .०० वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स
शुभा खोटे


पुणे, 4 फेब्रुवारी (हिं.स.)।

’२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’चा उद्घाटन सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच ,स्वारगेट ,पुणे ,येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५ .०० वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न होईल, अशी घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते.

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही ‘’शो मॅन ; राज कपूर’’ जन्मशताब्दी आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे व ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर ज्येष्ठ गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यंदा प्रख्यात चर्मवाद्यवादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल .उद्घाटन सोहळ्यानंतर Gloria, Country: Italy, Switzerland ,Dir : Margherita Vicario हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) म्हणून दाखवण्यात येणार आहे, तर The Room Next Door ,Country: Spain ,Dir: Pedro Almodovar या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाची घोषणा अभिजित रणदिवे यांनी केली. यामध्ये मार्को बेकिस - चिली-इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, मार्गारिवा शिल - पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका,पेट्री कोटविचा - फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक , तामिन्हे मिलानी - इराणी चित्रपट दिग्दर्शक , जॉर्जे स्टिचकोविच - सिनेमॅटोग्राफर सर्बिया, सुदथ महादिवुलवेवा - श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक, अर्चना - दक्षिण भारतीय अभिनेत्री,अनिरुद्ध रॉय चौधरी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा समावेश आहे.

समर नखाते म्हणाले, या महोत्सवात फिल्म सिटीच्या एमडी – स्वाती म्हसे पाटील यांचे चर्चासत्र – १४ फेब्रुवारी आणि प्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शकांशी चर्चा (उमेश कुलकर्णी, अनुपमा श्रीनिवासन, सर्वनिक कौर, कुलदीप बर्वे – १५ फेब्रुवारी) हे वर्कशॉप होणार आहेत.

ज्येष्ठ साहित्यसम्राट विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यान – बोमन इराणी – १६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे .सिनेमा अँड सोल ; तपन सिन्हा – (स्वपनकुमार मल्लिक आणि गौतम घोष – १७ फेब्रुवारी), Ai फिल्म्सच्या माध्यमातून चित्रपटाच्या आशयाची निर्मिती - पॅको टोरेस (१८ फेब्रुवारी) आणि मराठी पॅनल: मराठी चित्रपटातील आव्हाने: निर्मिती ते प्रेक्षक: (परेश मोकाशी, आदित्य सोरपोतदार, आदिनाथ कोठारे, सुनील फडतरे १९ फेब्रुवारी). हे मास्टरक्लास संपन्न होईल.

१३ ते २० फेब्रुवारीदरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’ होणार आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी कॅटलॉग फी. रुपये ८०० फक्त आहे.

पुरस्काराचे मानकरी

शुभा खोटे :

जन्म - ३० ऑगस्ट, १९३७, मराठी तसेच हिंदी भाषेतील चित्रपटात व दूरचित्रवाहिनी मालिकात काम केले आहे.पावणे दोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्यानंतर त्यांची कारकीर्द चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून गाजली.क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या शुभा खोटे यांना एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी १९५५ साली त्यांना ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. 'पेईंग गेस्ट’या चित्रपटात त्यांनी खलनायिका होती. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ हे ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके अनेक चित्रपटात काम केले. एक दूजे के लिये, चिमुकला पाहुणा (मराठी चित्रपट), छोटी बहन, जिद्दी, दिल एक मंदिर, दिल तेरा दिवाना, पेईंग गेस्ट, भरोसा, ससुराल, सीमा हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

कविता कृष्णमूर्ती :

कविता कृष्णमूर्ती उर्फ शारदा कृष्णमूर्ती म्हणून जन्म , 25 जानेवारी 1958, कविता यांनी हिंदी , बंगाली , कन्नड , राजस्थानी , भोजपुरी , तेलगू , ओडिया , मराठी , इंग्रजी , उर्दू , तमिळ , मल्याळम , गुजराती , नेपाळी , आसामी , कोकणी , पंजाबी आणि इतर भाषांसह विविध भाषांमध्ये असंख्य गाणी रेकॉर्ड केली आहेत त्यांना चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार आणि 2005 मध्ये पद्मश्री मिळाले .. कविता यांच्या पार्श्वगायन करिअरची सुरुवात कन्नड भाषेतील चित्रपटांपासून झाली. त्यांनी एकूण 18 हजारांहून अधिक गाणी गायली. आंख मारे (चित्रपट - तेरे मेरे सपने), तू चीज बडी है मस्त मस्त (चित्रपट -मोहरा), डोला रे डोला ( चित्रपट – देवदास). अशी त्यांची असंख्य गाणी गाजली.

अनुपम खेर :

अनुपम खेर (जन्म ७ मार्च १९५५). चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 540 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे . खेर यांना त्यांच्या अभिनयासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले .खेर यांच्या इतर प्रशंसित भूमिकांमध्ये ए वेनस्डे! (2008), एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (2016) आणि द काश्मीर फाइल्स (2022); या त्यांच्या कलाकृती अविस्मरणीय ठरल्या. पुण्यातील फिल्म अंड टेलिव्हिजन ईनस्टीट्युट ऑफ इंडियाचे ते काहीकाळ संचालक होते.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande