रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : राजापूर आणि परिसरातील रसिकांना नेहमीच विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या मित्रमेळा संस्थेने नववर्षातील पहिला कार्यक्रम बुधवारी, दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. जादूची पेटी हा तो कार्यक्रम आहे.
सर्वानाच परिचयाची असलेली बाजा पेटी किंवा हार्मोनियम या वाद्यचा प्रवास, इतिहास आणि त्यातून उमटणाऱ्या जादूई स्वरांनी सजलेली लोकप्रिय गाणी यांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. जागतिक कीर्तीचे हार्मोनियम वादक व संगीत संयोजक आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू हे या कार्यक्रमातील मुख्य जादूगार असतील. प्रसाद पाध्ये याची तबला साथ आणि अनिल करंजवकर यांची ढोलक आणि ढोलकी हे त्या दोघांना तोलामोलाची साथ करणार आहेत.
माजी मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच राजापूरच्या भाजपच्या प्रदेश स्तरावरील महिला नेत्या शिल्पताई मराठे, अनिकेत पटवर्धन यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे.
हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ६ वाजता राजापूर हायस्कूलच्या भव्य मैदानात होणार असून तो विनामूल्य आहे. रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन मित्रमेळा राजापूर संस्थेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी