पुणे, 5 फेब्रुवारी (हिं.स.)।
वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांचे आकस्मित निधन झाले. श्रीक्षेत्र देहूगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज (बुधवारी) सायंकाळी चार वाजता अंत्यविधी होणार आहे.
वारकरी संप्रदायाचे एक समर्थ नेतृत्व पडद्यामागे गेल्याने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने इतिहास आणि संत साहित्य विश्वातला एक जाणकार हरपला. समस्त हिंदू समाज आणि हिंदुत्वविषयक अभियानांचे मोठे नुकसान झाल्याची खंत शिवशंभू विचार मंचाचे महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना हिंदुत्व चळवळीशी जोडण्याचे काम शिरीष महाराज मोरे यांनी केले. त्यांनी नुकत्याच झालेल्या विशाळगड मुक्ती संग्रामात आक्रमी भूमिका घेत प्रशासनाला न्याय देण्यास भाग पाडले.
बालपणापसूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. प्रखर वक्ते, संत साहित्याचे जाणकार, विशेषतः डाव्या पुरोगामी चळवळीकडून संत विचारांची जी चुकीची मांडणी केली जात आहे. त्याविषयी त्यांनी वेळोवेळी योग्य आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडली होती. त्या निमित्ताने त्यांचा महाराष्ट्रभर प्रवास होत होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विद्रुपीकरणा विरोधात त्यांनी शेकडो सभा घेऊन निर्भिड सत्यनिष्ठ भूमिका घेतली होती. एक विचारवंत, अभ्यासक आणि संत परपरेचा वारसा लाभलेला युवा नेतृत्त्व हरपल्याने महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु