अमृतसर , 5 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात दाखल झाले आहे. या विमानात 104 भारतीय प्रवासी असल्याचं सांगितले जात आहे.बुधवारी (5 फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास अमेरिकन लष्कराचे सी-17 विमान अमृतसर विमानतळावर उतरले. पॅसेंजर टर्मिनलऐवजी ते हवाई दलाच्या एअरबेसवर उतरवण्यात आले.
अमृतसर विमानतळावर आणलेल्या विमानात एकूण १०४ भारतीय होते, ज्यात १३ मुले, ७९ पुरुष आणि २५ महिलांचा समावेश होता. या भारतीयांपैकी हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, पंजाबमधील 30, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेश-चंदीगडमधील 2 जणांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये काही कुटुंबेही आहेत. याशिवाय 8-10 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील लोकांना रस्त्याने घरी पाठवले जाईल. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील लोकांना विमानानेच पुढे पाठवले जाऊ शकते.
अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची पडताळणी केली जात आहे. येथून, इमिग्रेशन आणि कस्टम्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर ते पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. त्यासाठी बसेस आत बोलावण्यात आल्या आहेत. अमेरिकेने एकूण 205 भारतीयांना निर्वासित करण्यासाठी चिन्हांकित केले आहे. दरम्यान, 186 भारतीयांना डिपोर्ट करण्याची यादीही समोर आली आहे. उर्वरित लोक कुठे आहेत आणि त्यांना कधी पाठवले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रम्प यांनी 11 दिवसांत 25 हजाराहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले. ट्रम्प यांच्या आईस टीमने (इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट) 12 राज्यांमध्ये छापे टाकले.
वृत्तानुसार, सर्वाधिक छापे रिपब्लिकन राज्यांमध्ये झाले आहेत. यापैकी 1700 अवैध स्थलांतरित भारतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वीच 18 हजार अवैध अनिवासी भारतीयांची हद्दपारीसाठी निवड करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode