मुंबई, 11 मार्च (हिं.स.)।दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला आणि १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ९ महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली. भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा व त्याच्या कुटुंबिय सोमवारी(दि. १०) मुंबईत परतले. या उल्लेखनीय यशानंतर रोहितचे मुंबईत जंगी स्वागत झाले.
कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर पोहोचला आणि चाहत्यांनी त्याचं अभूतपूर्व स्वागत केलं. त्याच्या आगमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत मुंबईत पोहोचताच चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण विमानतळ रोहित, रोहित! च्या घोषणांनी दणाणून गेला. काही चाहत्यांनी पोस्टर्स आणि बॅनर्स घेऊन रोहितच्या विजयी नेतृत्वाचं कौतुक केलं.
या क्षणाने रोहितही भावूक झाला आणि चाहत्यांना हात हलवून अभिवादन केलं. भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभर सुरू आहे, आणि मुंबई विमानतळावरील हा व्हिडिओ हेच दर्शवतो.
फायनल सामन्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत आला आणि मी कुठेही जात नाही. मी वन डेतून निवृत्त होत नाहीए. त्यामुळे कृपया अफवा पसरवू नका, असे स्पष्ट सांगून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावला. रोहितने २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याचा इरादा केल्याचे, यावरून स्पष्ट होतेय. पण, त्याआधी तो भारताकडून वन डे क्रिकेट खेळताना केव्हा दिसेल, याची उत्सुकता आहे. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत माझी भन्नाट फलंदाजी होत होती. पाच शतके मी ठोकली होती, पण तरीही समाधान मिळाले नाही, कारण संघ उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता. यंदाच्या स्पर्धेत माझ्याकडून मोठी कामगिरी झाली नाही, पण मला अंतिम सामन्यात संघाला विजयाकडे न्यायला मदत करणारी खेळी करता आली म्हणून खूप मोठे समाधान आहे, असे रोहित मनापासून बोलत होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode