रत्नागिरी, 12 मार्च, (हिं. स.) : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर अनधिकृत मासेमारीवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये आज पहाटे एलईडी लाइट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.
आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास लाडघर-बुरोंडीसमोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) आणि स्वप्नील चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) स्थानिक लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गस्त घालत होते.
यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली यासिन अब्दुल गफूर मुकादम (खडप मोहल्ला, रत्नागिरी) यांची नौका अब्दुल गफूर (नों. क्र. IND-MH -4-MM-6007)द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात अनधिकृतरीत्या एलईडी लाइट वापरत असल्याचे निदर्शनास आले. ही नौकाट विभागाने पकडली. या नौकेवर तांडेलसह ४ खलाशी होते. नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. नौकेवर मासळी आढळली नाही. नौकेवरचे लाइट आणि लाइट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत.
ही कारवाई रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचाऱ्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी