जळगाव, 12 मार्च, (हिं.स.) - चोपडा तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी महेंद्र धोंडू जाधव (वय ४२) यांची केवायसी पूर्ण करण्याच्या नावाखाली ६ लाख १७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
शर्मा नावाच्या व्यक्तीने राष्ट्रीयकृत बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जाधव यांचे बँक खाते आधार आणि पॅन कार्डशी लिंक नसल्याचे सांगून केवायसी (KYC) पूर्ण करण्याची विनंती केली. यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून जाधव यांना एक लिंक पाठवण्यात आली, ज्याद्वारे त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून फसवणूक करणाऱ्यांनी ६ लाख १७ हजार रुपये काढले. महेंद्र जाधव यांनी तत्काळ जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शर्मा नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत. सामान्य नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे आणि अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कॉल्स किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर