नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।
- मनपा मध्ये परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बाबत नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्रीना तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
परसेवेतील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीने नेमणुका देण्यापेक्षा नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन प्राधान्य देण्याची मागणी दि. २२ फेब्रुवारी रोजी शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. नगरविकास विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या विषयाला बगल देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी महुआ बॅनर्जी यांची शासनाकडून प्रतिनियुक्तीने नाशिक महापालिकेत नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या एका पत्रावर बॅनर्जी यांच्याकडे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतर शिवसेनेने हा विषय थेट नगरविकामंत्री शिंदे यांच्यापर्यंत नेला. त्यावर दोन आठवड्यांनी , परंतु नगरविकास विभागाने दखल घेतप्रतिनियुक्तीसंदर्भातील अहवाल मागविला आहे. त्याचबरोबर दि. ५ मार्च रोजी देखील तिदमे यांनी परसेवा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविषयीचा मुद्दा शिंदे यांची भेट घेत निदर्शनास आणून देत पदोन्नतीने स्थानिक अधिकाऱ्यांना कामाची संधी मिळावी, अशी मागणी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI