रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : प्रतिवर्षाप्रमाणे राजापूर येथील शिवस्मृती मंडळातर्फे फाल्गुन कृष्ण तृतीया, सोमवार, दि. १७ मार्च रोजी जवाहर चौक येथिल शिवस्मारकात तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त रविवार आणि सोमवारी दोन दिवस वाहन फेरी, चित्ररथ मिरवणूक, युद्धकला प्रात्यक्षिक व राष्ट्रीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांची 'गर्जती सह्याद्रीचे कडे' ही छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाहनफेरीने या उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. दि. १६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सकाळी ९.३० वाजता धर्मध्वजाचे पूजन, सकाळी १० वाजता वाहनफेरी काढली जाणार आहे. ती एस. टी. डेपो येथून सुरू होऊन पेट्रोल पंप, मेन रोड, जवाहर चौक - छत्रपती संभाजी महाराज पेठ मार्गे वरचीपेठ, राजीव गांधी स्टेडिअम, बंदर धक्का, छत्रपती शिवाजी मार्ग, कै. वैशंपायन गुरुजी पूल मार्गे गुजराळी, चापडेवाडी, ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, खडपेवाडी मार्गे पुन्हा शिवस्मारक येथे येईल. सायंकाळी ७ ते १० या वेळेत गाथा शिवरायांची या स्थानिक कलाकारांच्या शिवचरित्रावरील विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे.
सोमवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीची पाद्यपूजा, अभिषेक, पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता शिवकालीन चित्ररथ देखाव्यांसह छत्रपती शिवाजी शिवरायांचा पालखी सोहळा होणार आहे. यामध्ये पालखी, ढोलपथके, लेझीम पथक, झांज पथक यांसह शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. रात्री ९ वाजता राष्ट्रीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे स्थानिक कलाकारांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा सादर करणार आहेत.
सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन शिवस्मृती मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी