रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : ऑल इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे या वर्षी घेण्यात आलेल्या १३३ व्या वार्षिक चित्रकला प्रदर्शनात सुमारे ३ हजार चित्रे आली होती. त्यापैकी सुमारे २५० चित्रांची निवड करण्यात आली. यामध्ये रत्नागिरीचे चित्रकार किरण किसन घाणेकर यांची निवड झाली असून त्यांना कृष्णराव केतकर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले.
किरण घाणेकर यांच्या द बोट इन शॅडो या चित्राला हा सन्मान मिळाला आहे. प्रदर्शनाकरिता संपूर्ण भारतातील प्रोफेशनल चित्रकार आले होते. त्यात किरण घाणेकर यांच्या चित्राची निवड झाली. या लक्षवेधी चित्राबद्दल हा पुरस्कार ज्येष्ठ कलाकार आणि प्रोफेसर रामटेके, आंतरराष्ट्रीय चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत, आंतरराष्ट्रीय सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
किरण घाणेकर नामांकित बीआरडीएस आर्ट अँड डिझाईन स्टुडिओ इन्स्टिट्यूटमध्ये मुंबईत कार्यरत आहे. त्यांना चित्रकलेच्या योगदानाबद्दल आझादी का अमृत महोत्सव या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला होता. २०२४ मध्ये पुणे आर्ट बिट्स फाउंडेशनतर्फे नामांकनही त्यांनी पटकाविले आहे. किरण घाणेकर रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावातील सुपुत्र आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. किरण घाणेकर यांच्या कलेविषयी व व्यापक संकल्पनेविषयी सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी