ठाणे, 14 मार्च (हिं.स.)। होळी आणि धुळवड या सणाच्या निमित्ताने शुक्रवारी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण पूरक होळी साजरी व्हावी या उद्देशाने होळी विशेष सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण पूरक होळी साजरी करूया, नैसर्गिक रंगाचा वापर करूया असा संदेश यावेळी देण्यात आला.
सकाळी सव्वा सात वाजता नितीन कंपनी ते मीठ बंदर रोड या शॉर्ट राईडचे आणि श्रीमा बालनिकेतन - दिघा ते मीठ बंदर रोड या लॉंग राईडचे आयोजन करण्यात आले होते. शॉर्ट राईडचे नेतृत्व श्वेता चिलकेवार, चंद्रशेखर जगताप, गुरुप्रसाद देसाई ज्ञानदेव जाधव यांनी तर लॉन्ग राईडचे नेतृत्व गणेश कोळी, गिरीश चिलकेवार, पंकज रिजवानी, गजानन दांगट, निखिल शिवलकर यांनी केले. या दोन्ही राईड सकाळी ८ वा. ठाणे पूर्व येथील मीठबंदर रोड येथे समाप्त झाल्या. राईड समाप्त झाल्यानंतर सर्व सायकलप्रेमींनी पुरणपोळी, जिलेबी, फापडा या खाद्यपदार्थ पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी संस्थेच्या संस्थापिका - अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी नैसर्गिक रंगाचे महत्त्व सांगत प्राण्यांवर कुठेही रंग फेकताना आढळल्यास हे प्रकार तातडीने रोखण्याची जबाबदारी सायकलप्रेमींची आहे. पर्यावरण वाचवूया आणि प्राण्यांवर रंग फेकण्याचे प्रकार रोखूया अशी जनजागृती करण्यात आली. यावेळी शुभांगी भोर, गायत्री रिठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर