नवी मुंबई, 14 मार्च (हिं.स.)। नवी मुंबईकर नागरिकांना ऑनलाईन मालमत्ताकर भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकडे प्राधान्याने लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक स्वरूपात नवी मालमत्ताकर ऑनलाईन संकलन प्रणाली सुरु केली आहे.
या नव्या प्रणालीव्दारे जलद व अत्यंत सहजपणे मालमत्ता कर भरणे शक्य होत असल्याने ही ऑनलाईन प्रणाली उत्तम असल्याचे अभिप्राय विविध स्तरांतील नागरिकांकडून स्वयंस्फुर्तीने प्राप्त होत आहेत. याशिवाय या नव्या प्रणालीमुळे ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही साधारणत: 15 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नेट बॅकिंग, युपीआय, क्यूआर कोड, वॉलेट्स या सारख्या जलद व सुलभ कार्यप्रणाली असणारे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले विविध पेमेंट पर्याय नागरिकांना उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून प्रत्यक्ष महानगरपालिका कार्यालयात जाऊन करभरणा करण्याच्या पारंपारिक ऑफलाईन पध्दतीपेक्षा, कुठेही न जाता घरुन अथवा कार्यालयातून ऑनलाईन पेमेंट करण्याच्या पध्दतीला मोठया प्रमाणावर पसंती दिली जात आहे.
यामध्ये अधिक भर घालत येत्या 10 ते 12 दिवसात ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम (BBPS)’ कार्यान्वित होत असून या सुविधेमुळे सर्व प्रमुख बँका, पेमेंट ॲप्स व इतर डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन थेट मालमत्ता कर भरणे शक्य होणार आहे. यामुळे कोणत्याही बँकेतून किंवा ॲपमधून सहज पेमेंट करता येणार आहे व विशेष म्हणजे कोणत्याही वेळी, कुठूनही 24x7 पेमेंटची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे एनपीसीआयच्या मान्यतेने या प्रणालीव्दारे अधिक सुरक्षित व जलद व्यवहार होणार आहे. त्यामुळे ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम (BBPS)’ सुरु झाल्यानंतर ऑनलाईन करभरणा करणाऱ्यांच्या संख्येत अजून 15 ते 20 टक्के वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
नागरिकांना कमी श्रमात व त्यांच्या वेळ आणि मूल्यात बचत होऊन करभरणा करण्याची प्रभावी सुविधा उपलब्ध असावी याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विशेष लक्ष देत जुन्या ऑनलाईन करभरणा प्रणालीतील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करून अधिक सुलभ व सहज अशी नवीन ऑनलाईन करभरणा प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे. या अधिक सोयीस्कर ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिक घरुन अथवा कार्यालयातून सहजपणे करभरणा करु शकतात. त्यामध्ये आता लवकरच ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम (BBPS)’ प्रणालीची लक्षणीय भर पडत असून याव्दारे करभरणा अधिक जलद व सुलभ होणार आहे.
याशिवाय महानगरपालिकेने थकबाकीदार नागरिकांसाठी मालमत्ताकर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर केली असून नागरिकांनी 31 मार्च रोजी, रात्री 12 वाजेपर्यंत विलंब शुल्क वजा करुन अपली देयके भरावीत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने