नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।
द्वारका येथील श्री श्री राधा मदन गोपाल मंदिर (इस्कॉन) येथे गौर पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गौर पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी (दि.१४) इस्कॉन मंदिरात श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांची व वेदीची सुंदर सजावट करण्यात आली होती.
सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महोत्सवाला सकाळी ५ वाजताच्या मंगल आरतीपासून सुरुवात झाली. हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन झाले. महोत्सवासाठी बेळगाव वरून इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी प. पू. भक्ती रसामृत स्वामी महाराज आले होते. त्यांचे प्रवचन झाले.
संध्याकाळी श्री श्री गौर निताई यांच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. १४८६ साली बंगालमध्ये कलियुगासाठी युगधर्म असलेल्या हरिनाम कीर्तनाचे प्रवर्तक श्री चैतन्य महाप्रभू यांचा जन्म झाला होता. कलियुगातील बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्णच चैतन्य महाप्रभूच्या रूपात अवतरित झाले होते. याच दिवसाला गौर पौर्णिमा म्हणतात. विश्वभारातील सर्व इस्कॉन मंदिरांत तसेच बंगालमध्ये घरोघरी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. २५०० भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI