रिश्टर स्केलवर 5.2 आणि 4 तीव्रतेची नोंद
नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) : देशभरात होळीचा उत्सव साजरा होत असतानाच पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश आणि कारगिलला भूकंपाचे हादरे बसले. कारगिल येथे रिश्टर स्केलवर 5.2 आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने आपल्या ट्विटर हँडलवर (एक्स) दिली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार पहिला भूकंप उत्तर भारतात झाला. याचे केंद्रबिंदू लद्दाखच्या कारगिल परिसर होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर 2.50 वाजता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. कारगिल भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 15 किलोमीटर खोलीवर होते. भूकंप रात्री उशिरा झाला, त्यामुळे बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नव्हती. पण ज्यांना कळले, ते लगेच घराबाहेर निघाले. कारगिल परिसरात रात्रीचे तापमान खूपच कमी असल्याने, येथे अजूनही थंडी सुरूच आहे. त्यानंतर 4 तासांनी अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंगा येथे सकाळी 6.1 वाजता भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र जमीनीपासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी