अमरावती, 28 मार्च, (हिं.स.)
शहरातील मुख्य बाजारपेठ व अतिशय वर्दळीचा मार्ग असलेल्या प्रिया टॉकीजसमोरून एका तरुणाच्या हातातील पावणेतीन लाख रुपये रोख असलेली बॅग तीन ते चार लुटारूंनी हिसकावली आहे. ही घटना गुरुवारी ८ वाजता घडली.
राजकमल चौक परिसरात आकाश आनंदानी यांचे मोबाइलचे दुकान आहे. याच दुकानात मंगेश वासुदेवराव काळे (२६, गोपालनगर, अमरावती) हा काम करतो. आकाश आनंदानी यांनी विकलेल्या मालाची वसुली करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मंगेश शहरातीलच मार्केटमध्ये गेला होता. काही दुकानातून त्याने रक्कम वसूलही केली होती. ही संपूर्ण रक्कम मंगेशने एका बॅगमध्ये ठेवली होती. मंगेश बॅग घेऊन प्रिया टॉकीजजवळ उभा असताना अचानक तीन ते चार अनोळखी लुटारू आले व मंगेशकडे असलेल्या बॅगवर त्यांनी झडप मारली. या वेळी मंगेशने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र लुटारूंची संख्या तीने ते चार असल्यामुळे ते रोख असलेली बॅग घेऊन पसार झाले. या बॅगमध्ये पावणे तीन लाख रुपयांची रक्कम असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले आहे. बॅगची ओढताण सुरू असताना मंगेशने प्रतिकार केल्यामुळे एका लुटारूने मंगेशला मारहाण केली. या मारहाणीत बॅगचा पट्टा तुटला आहे. या घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके व कोतवाली पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरात दोन दिवसांत लूटमारीची भररस्त्यात घडलेली चौथी घटना शहरात अलीकडे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. चोरी, घरफोडी, वाहनचोरी नित्याचीच झाली असताना मागील दोन दिवसांत भररस्त्यात लुटमारीची घडलेली ही चौथी घटना आहे. बुधवारी पहाटे एका कंत्राटदाराला चाकू मारून ७० हजार लूटले, त्यानंतर राजापेठच्याच हद्दीत एका १७ वर्षीय मुलाला मारहाण करून १२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लूटला. त्यानंतर बडनेरा ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला गंभीर मारहाण केली आणि चौथी घटना गुरुवारी सायंकाळी कोतवालीच्या हद्दीत मुख्य बाजारात घडली आहे.
फुटेजच्या आधारे लुटारूंचा शोध प्रिया टॉकीजसमोरून तरुणाच्या हातातील पावणे तीन लाख रुपये रोख असलेली बॅग लुटारूंनी पळवली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लुटारूंचा शोध सुरू केला आहे. -
मनोहर कोटनाके, ठाणेदार कोतवाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी