
रायगड, 12 मार्च (हिं.स.) : तालुक्यातील निजामपूर येथे घरफोडीची घटना घडून सोन्या-चांदीच्या मूर्ती, दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ३ लाख २३ हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून ते ११ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली. मौजे सराफ आळी, निजामपूर येथील फिर्यादी यांच्या घराचे दरवाज्याचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश करत घरातील सोन्याच्या व चांदीच्या धातूच्या मूर्ती, दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ३,२३,७०० रुपयांचा ऐवज चोरी करून नेला.
घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात याबाबत माणगाव पोलीस ठाणे गुरनं.71/2026, भा.न्या.स.क 305(A),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/श्रीकांत किरवले हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)