सांगली, 28 मार्च (हिं.स.)।
जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून त्याचे पुढील आठवड्यात सादरीकरण करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिल्या.
जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटर धावन मार्गाचे सिंथेटीक धावन मार्ग, बॅडमिंटन हॉलचे अद्ययावतीकरण, जलतरण तलाव दुरूस्ती, कबड्डी, खो-खो खेळाकरिता डोमची सुविधा, जलतरण तलावासाठी सौर ऊर्जा पॅनेल, बाह्यस्त्रोतातून संकुल देखभाल व कार्यालयीन कामासाठी कर्मचारी नियुक्ती, आदि कामांसाठी सविस्तर आराखडा तयार करावा व त्याचे सादरीकरण पुढील आठवड्यात करावे. ही सर्व कामे तात्काळ सुरू करून ती येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. क्रीडा संकुलातील सोयी-सुविधा वाजवी भाडे तत्त्वावर देण्यासाठी नियमावली तयार करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रलंबित बुद्धिबळ भवन उभारणीसंदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसंदर्भात आराखडा तयार करण्याबाबत सूचना केल्या. तसेच, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलच्या सद्यस्थितीची पाहणी करून तो अद्ययावत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही क्रीडा संकुलातील सोयी-सुविधा वाजवी भाडे तत्त्वावर देऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबाबतच्या कामांची सविस्तर माहिती दिली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने