
नवी दिल्ली, 12 मार्च (हिं.स.)केकेआरचा माजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू जेव्हॉन सिअरल्स, टायटन्स संघाचे मालक चित्तरंजन राठोड आणि वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे झालेल्या ब्रिम१० स्पर्धेत खेळणारा संघ अधिकारी ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे. २०२३-२४ हंगामात मॅच फिक्सिंग आणि इतर गैरवर्तन केल्याबद्दल आयसीसीने तिघांनाही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, तिघांनाही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात येईल आणि त्यांना १४ दिवसांच्या आत आयसीसीला उत्तर द्यावे लागणार आहे.
आयसीसी आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या सहकार्याने काम करत तिघांनाही अटक केली. ब्रिम१० स्पर्धा क्रिकेट वेस्ट इंडिज अंतर्गत येत असल्याने, त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटने आरोप दाखल केले आहेत. ग्रिफिथवर आंतरराष्ट्रीय सामन्यात छेडछाडीचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे. राठोडवर तीन, सेअरल्सवर चार आणि ग्रिफिथवर पाच आरोप आहेत.
राठोड, सेअरल्स आणि ग्रिफिथवर क्रिकेट वेस्ट इंडिज कोडच्या कलम २.१.१ अंतर्गत मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. त्यांनी कलम २.१.४ चे उल्लंघन केल्याचे देखील आढळून आले आहे. ज्यामध्ये खेळाडू किंवा अधिकाऱ्याला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, सूचना देणे किंवा मदत करणे याचा समावेश आहे. शिवाय त्यांनी कलम २.४.४ चे उल्लंघन केल्याचे देखील आढळून आले आहे. यामध्ये भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्याला चौकशीत सहकार्य न करणे समाविष्ट आहे. या तीन आरोपांव्यतिरिक्त, सिअरल्स आणि ग्रिफिथ यांच्यावर कलम २.४.२ चे उल्लंघन केल्याचा देखील आरोप ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये क्रिकेट वेस्ट इंडिजसोबत अधिकाऱ्याची माहिती शेअर न करणे समाविष्ट आहे.
आयसीसी संहितेच्या कलम २.४.७ अंतर्गत एकट्या ग्रिफिथवर आणखी आरोप आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या चौकशीत अडथळा आणल्याचा आणि भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कारणास्तव आयसीसी ग्रिफिथविरुद्ध स्वतंत्र कारवाई करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे