सोलापूरचे नाव ऑलिंपिकमध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे
सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.)। येथील नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर १० वर्षाखालील व १३ वर्षाखालील गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्
Jh


सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.)। येथील नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर १० वर्षाखालील व १३ वर्षाखालील गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा चार दिवस चालणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास रणदिवे होते. यावेळी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, सहसचिव सोनल बुंदेले, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अजिंक्य रणदिवे, वास्तुविशारद अमर नागमोडे तसेच नुकतीच क्रीडा अधिकारी म्हणून निवड झालेले विठ्ठल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात धनुर्विद्या क्रीडा प्रकार झपाट्याने विकसित होत आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून रत्नागिरीपर्यंत विविध जिल्ह्यांमधून आलेले सहा ते दहा वर्ष वयोगटातील खेळाडू उत्कृष्ट कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या कामगिरीवरून भविष्यात भारताचे नाव ऑलिंपिकमध्ये उजळवणारे खेळाडू याच भूमीतून तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात हरिदास रणदिवे यांनी शालेय स्तरावर क्रीडा हा विषय अनिवार्य करून त्याला गुणदान दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेमाची बीजे अधिक प्रभावीपणे रुजतील, असे मत व्यक्त केले. प्रमोद चांदूरकर यांनी सांगितले की, देशाच्या संघात सुमारे ७० टक्के खेळाडू महाराष्ट्रातील आहेत, ही बाब राज्यातील पालक, प्रशिक्षक आणि जिल्हा संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून सुमारे साडेसातशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले असून चार दिवस नेहरूनगर येथील क्रीडांगणावर आपले क्रीडा कौशल्य सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावता घाडगे यांनी केले.

यावेळी क्रीडा अधिकारी म्हणून निवड झालेल्या विठ्ठल भालेराव यांचा डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक, खेळाडू, प्रशिक्षक व अधिकाऱ्यांचे आभार आयोजकांनी मानले.

दरम्यान, गुरुवारी इंडियन राऊंडच्या स्पर्धा पार पडल्या असून शुक्रवारी रिकर्व्ह व कंपाऊंड राऊंडच्या स्पर्धा होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande