नाशिक, 30 मार्च (हिं.स.)।
- माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, असे सांगून पहिल्या प्रेयसीशी लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या के ल्याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनीषा संतोष भालेराव (रा. बेथेलनगर, शरणपूर रोड, नाशिक) यांच्या बहिणीची मुलगी व आरोपी वेदांत प्रवीण पाटील (वय १९, रा. महाकाली चौक, पवननगर, सिडको) यांचे एकमेकांवर प्रेम होते. अँश्ली हिचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या दोघांचे लग्न लावून द्यायचे ठरलेले होते; मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी वेदांत पाटील याने प्रेयसी अँश्ली हिला भेटून माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, असे सांगून लग्न करायला नकार दिला. त्यामुळे सदर मुलगी ही तणावात होती. लग्नास नकार दिल्यानंतर प्रियकर वेदांत पाटील हा तिच्यासोबत जात नव्हता, तरी पण ती त्याला भेटण्यासाठी जात असे. तेव्हा तो तिला मारहाण करून मानसिक त्रास देत असे. दि. २८ मार्च रोजी मुलगी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास आरोपी पाटील यास भेटून फिर्यादीच्या राहत्या घरी आल्यानंतर तिने छताच्या लाकडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रियकर वेदांत पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI