जळगाव, 1 एप्रिल (हिं.स.) शहरात वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला जळगाव पोलिसांनी केवळ काही तासांतच जेरबंद केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण २५,००० रुपये रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. ही कारवाई नेत्रम प्रोजेक्टच्या अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने करण्यात आली.
शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हे अजिंठा चौफुली (एमआयडीसी, जळगाव) येथे नांदुरा येथे जाण्यासाठी रिक्षाच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या जवळ २५,००० रुपये रोख रकमेची प्लास्टिक पिशवी होती. याच दरम्यान, एक रिक्षा (MH19-CW-5250) त्यांच्या जवळ येऊन थांबली. रिक्षाचालकाने खामगावला जात असल्याचे सांगत फिर्यादींना प्रवासासाठी विचारले. फिर्यादींनी होकार दिल्यानंतर त्यांना मागच्या दोन प्रवाशांसोबत बसवण्यात आले. थोडे अंतर गेल्यावर मागच्या प्रवाशांनी बसण्यास त्रास होत असल्याचे सांगत फिर्यादींना खाली उतरायला सांगितले. फिर्यादी खाली उतरताच त्यांनी पैशांची पिशवी पाहिली असता, ती कापलेली दिसली आणि त्यातील पैसे गायब होते. त्यांनी त्वरित रिक्षा थांबवण्यासाठी ओरडले. मात्र, रिक्षाचालक वेगाने पळून गेला. फिर्यादींनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नेत्रम प्रोजेक्ट’ विकसित केला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे थेट पोलीस नियंत्रण कक्षाला जोडलेले आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नेत्रम प्रोजेक्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गिते, गणेश ठाकरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित रिक्षा आढळून आली. रिक्षाचालक वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांची नावे पुढे आली. तौसीफ खान सत्तार खान (रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) , एक अल्पवयीन आरोपी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीसह तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी गोपनीय माहिती काढून तिघांनाही तात्काळ अटक केली आणि फिर्यादींची चोरलेली २५,००० रुपये रक्कम व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर