नाशिक, 2 एप्रिल (हिं.स.)।
सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान टपरीच्या दुकानात आलेल्या इसमाने सिगारेट मागितल्यानंतर एक रुपयाच्या फरकामुळे झालेल्या वादात टपरी चालकाने ग्राहकास मारहाण केल्यानंतर उपचारांनंतर त्याचा घरी मृत्यू झाल्याने हा खून की अकस्मात मृत्यू याबाबत सिडकोत चर्चानां उधाण आले आहे.
याबाबत अधीक माहिती अशी दिनांक २ एप्रिल बुधवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ असलेल्या एका पान दुकानावर मयत विशाल भालेराव(५०,पाथर्डी फाटा) हा सिगारेट घेण्यासाठी गेले असता टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे(५९, शिवपुरी चौक) याने सिगारेटचे अकरा रुपये मागितले परंतु मयत विशाल भालेराव याने ही सिगारेट सर्वं जगात दहा रुपयांना मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकतात असा जाब विचारल्याचा राग आल्याने त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, यात त्यांच्यात झालेल्या वादात टपरी चालक संशईत बापू सोनवणे याने विशालच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली.
यात जखमी झालेल्या मयत भालेराव हा ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मालकाच्या लक्षात आले की डोक्यातून रक्त श्राव होतं आहे. त्यास खासगी रुग्णालयात नेवून त्याच्यावर उपचार करून डोक्यात तीन टाके पडल्याचे लक्षात आले. यानंतर मयत भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारस त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्यास उपाचारा साठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
याबाबत अंबड पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जो पर्यंत शव विच्छेदणाचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे सांच्या वतीने देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI