महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन
मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)- “क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशक
महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन


मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)- “क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशक्तीसाठी शिक्षणाची दारं खुली केली. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ठ रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली. आज दिसणारी सामाजिक न्यायाबाबतची जागरुकता, महिलांचा सर्वक्षेत्रातील आत्मविश्वासपूर्ण वावर, देशात निर्माण झालेली प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी समाजव्यवस्था ही क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, केलेला त्याग आणि घेतलेल्या परिश्रमांचे फळ आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, सामाजिक न्यायावर आधारीत, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ भारताचा पाया भक्कम करण्याचं फार मोठं काम महात्मा जोतीबा फुले यांनी केलं. बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्वं पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या संदेशानं देशात क्रांती घडविली.

क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी महिलांसाठीची देशातील पहीली शाळा सुरु केली. त्यातून महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात पहिला आत्मविश्वासानं वावरत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक झाल्या आहेत, याचं सर्व श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि हालअपेष्टांना आहे, याचा विसर पडता कामा नये. महात्मा जोतीबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंश्रश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेदाविरोधात दिलेला लढा आणि सत्यशोधक विचारांची चळवळ पुढे घेऊन जाणं, हे त्यांना खरं अभिवादन ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande