पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)
पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक संधी आहेत, परंतु त्याचे ब्रॅंडिंग करण्यात आपण मागे पडतो. येत्या नोव्हेंबरमध्ये पुण्यात पर्यटनाचे मोठे प्रदर्शन (एक्स्पो) भरविण्यात येणार आहेत. यात जगभरातील पर्यटनातील विविध घटकांना आमंत्रित केले जाईल.पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) डिपीआर रद्द झाला असला तरी पर्यटनाचा विकास आराखडा राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात झाली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालापासाठी आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पर्यटनाविषयी बोलताना डूडी म्हणाले, ‘जिल्ह्यातील गडकिल्ले, अष्टविनायक, डोंगर-दऱ्या, धबधबे, धरणे, नद्या ही पर्यटनांची स्थळे आहेत.केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक पुण्यात यावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने पर्यटन प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी जलपर्यटन, हॉट एअर बलून, पॅराग्लायडिंग सुरू करण्याचा विचार आहे.’यावेळी डूडी यांनी पुणे जिल्ह्याच्या पाच वर्षांचा ‘शेती ते उन्नती’ या कृषी आराखड्याबद्दलही सांगितले. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात कृषी क्षेत्रात प्रगती करण्याची खूप मोठी संधी आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचा पाच वर्षांचा कृषी क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. यात पाच पिकांचे उत्पादन करून निर्यात करणारे तयार करण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु