जळगाव, 14 एप्रिल (हिं.स.) वडिलांच्या नावाने असलेल्या विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल १०.७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर ठगाला अटक करण्यात आली आहे. मोंटू कुमार खेमचंद (३६, रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, सायबर पोलिसांनी गाजियाबाद येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
भुसावळ येथे रेल्वेत कार्यरत असलेल्या तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या विम्याची रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने बनावट कागदपत्रे पाठवली आणि त्याच्या खात्यात १० लाख ७४ हजार १९४ रुपये जमा करून घेतले. ही रक्कम आरोपीने वेगवेगळ्या राज्यांतील बँक खात्यांमध्ये वळवली. सायबर पोलिसांनी या व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण करून विविध बँक खात्यांची माहिती मिळवली. यामध्ये आरोपी मोंटू कुमार खेमचंदने सीएसपी सेंटरद्वारे वेळोवेळी रोख रक्कम काढून ती इतर साथीदारांच्या खात्यात वळविल्याचे उघड झाले. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ दिलीप विचोले, शिवनारायण देशमुख, पोकॉ हारुण पिंजारी, पोकॉ गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांच्या पथकाने गाजियाबाद येथे कारवाई करत आरोपीला अटक केली. सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर