
रायगड, 14 मार्च (हिं.स.) : रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावे ते रामराज रोडवरील बोरघर पुलाजवळ बोलेरो पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मौजे बापळे गावाच्या हद्दीत घडला. फिर्यादी, साक्षीदार आणि इतर प्रवासी हे आरोपीच्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्रमांक यूपी 21 ईटी 9385) या वाहनातून वावे ते रामराज रोडने प्रवास करत होते. शुक्रवार आणि रमजान महिन्याच्या निमित्ताने नमाज पठणासाठी ते जात असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान चालकाने वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून रस्त्याची परिस्थिती न पाहता निष्काळजीपणे व अतिवेगाने वाहन चालवले. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून बोलेरो पिकअप पलटी झाली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवाशांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या.
या दुर्घटनेत खुश अल्लाउदीन मोहम्मद (वय 32, रा. पिपरा कपुर, ता. काशिनगर, जि. हाटा, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 32/2026 नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 184 व 194 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)